- नवीन नियमावलीला राज्य सरकारकडून परवानगी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२१) :- राज्यातील २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन नियमावलीला राज्य सरकारकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून येत्या १ मे पासून सोसायटी पदाधिकाऱ्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाकडून निवडणूक आणि नियमावलीबाबत एक पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू असून त्याला सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून मान्यता घेण्यात येणार आहे.
नवीन नियमावलीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेबाहेरील अधिकाऱ्यांऐवजी संस्थेतील सभासदांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे.
संस्थेचे लेखापरीक्षक किं वा कर्मचारी यांची नेमणूक करता येणार नसल्याचे या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. सहकार विभागाच्या पॅनेलवरील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी व्यवस्थापन समितीने निर्णय घेण्याची अट या नियमावलीत घालण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील २० हजार गृहनिर्माण संस्थांपैकी २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था १८ हजार आहेत. त्यामध्ये सहा हजार संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया रखडली आहे. नवीन नियमावलीला मान्यता मिळाल्यामुळे या निवडणुका आता घेता येणार आहेत.