- आकर्षक परताव्याच्या भूलथापा; भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२१) :- आपसात संगनमत करून कंपनीमध्ये ग्राहकाने पैसे गुंतविल्यास जास्त मोबदला मिळण्याची फिर्यादी ग्राहकाला वेगवेगळी आमिषे दाखविली. त्यामध्ये साडेसात हजार रुपये गुंतविल्यास कंपनी ग्राहकाला एक प्रॉडक्ट देऊन ग्राहकाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्याला एक आयडी देणार. साडेसात हजार रुपयांची गुंतवणूक केलेल्या ग्राहकाने कंपनीला दोन ग्राहक आणून दिल्यास कंपनी त्या ग्राहकाला पाचशे रुपये कमिशन आणि रॉयल्टी म्हणून दर महिन्याला १ हजार २७५ रुपये देणार असल्याचे दुसरे अमिष दाखवले.
एसीएम प्लॅनच्या नावाखाली साडेसात हजार रुपयांची गुंतवणूक केलेल्या ग्राहकाने कंपनीला २७ ग्राहक आणून दिल्यास कंपनी त्या ग्राहकाला १३ हजार ५०० रुपये कमिशन आणि रॉयल्टी म्हणून १६ हजार ५७५ रुपये २४ महिने देणार. तसेच एक थायलंड टूर देणार असल्याचे तिसरे अमिश दाखवले. कंपनी प्रत्येक ग्राहकाला कंपनीच्या नफ्यामधील पाच टक्के रक्कम देणार असल्याचे चौथे अमिश आरोपींनी फिर्यादी यांना दाखवले.
जादा परताव्याचे आणि थायलंड टूरचे अमिश दाखवून फिर्यादी यांना आरोपींच्या कंपनीत आठ लाख ५५ हजार रुपये गुंतविण्यास सांगितले. त्यानंतर रॉयल्टी म्हणून ९२ हजार २७५ रुपये आरोपींनी फिर्यादी यांना परत दिले. प्लॅन प्रमाणे २४ महिने रॉयल्टी, थायलंड टूर, कंपनीच्या नफ्यातील पाच टक्के रक्कम न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. अशाच प्रकारे आरोपींनी फिर्यादी यांच्या तालुक्यातील अन्य लोकांची देखील फसवणूक केली. हा प्रकार जून २०१८ पासून २० एप्रिल २०२१ या कालावधीत ड्रीम व्हिजन ४ यु प्रा. लि. या कंपनीत मोशी प्राधिकरण येथे घडला. याबाबत प्रचंड दादासाहेब भुसारे (वय ४२, रा. डोणगाव, ता. केज, जि. बीड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ड्रीम व्हिजन ४ यु प्रा. लि. या कंपनीचे सीएमडी दिनेश कुरकुटे, संचालक दिपिका दिनेश कुरकुटे, प्रतिनिधी विनायक शिरोळे, उपाध्यक्ष नवनाथ मगर, सीओ अमित कुमार पोंडे, कॅशियर नितीन कुरकुटे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.