- सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांचे जनतेला आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मे. २०२१) :- महापालिकेच्या कोविड रुग्णालयात रुग्णांवर निशुल्क उपचार केले जातात. मात्र काही जण त्यासाठी पैसे घेत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. जर, महापालिकेच्या कोविड रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी रुग्ण अथवा नातेवाइकांकडून पैसे घेतले असतील तर संबंधितांनी थेट माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी केले आहे.
करोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे तसेच बाधितांना वेळेत आणि चांगले उपचार व्हावेत यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने कोविड रुग्णालयाची उभारणी केली आहे. येथे उपचारासाठी करोना बाधित रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी आणि उपचारासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. असे असतानाही केवळ आर्थिक हव्यासापोटी तीन डॉक्टरांनी मिळून एका महिला रुग्णाकडून तब्बल एक लाख रुपये घेतले. त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला.
पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे म्हणाले, करोनाबधित रुग्णाला महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्यासाठी ज्या रुग्णांना अथवा रुग्णांच्या नातेवाइकांना रूणालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांनी पैसे मागितले असतील आणि नागरिकांनी ते पैसे दिले असतील हा फसवणुकीचा प्रकार आहे. अशा नागरिकांनी पुढे येऊन थेट माझ्याशी (सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर ९७३०२००३८३) संपर्क करावा. तक्रारदारांची मागणी असेल तर त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही सहाय्यक आयुक्त डॉ. कवडे यांनी सांगितले.