- पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. मे. २०२१) :- पिंपरीतील नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटर मध्ये रविवारी (दि. ९) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास कोरोना मृताच्या दागिन्यांची चोरी झाल्याचा आणखी एक प्रकार सोमवारी (दि.१०) उघडकीस आला आहे.
रणवीर जवाहर ठाकूर (वय ३३, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना नेहरूनगर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या अंगावर ४० हजार रुपये किमतीचे १८ ग्रॅम सोन्याचे व चांदिचे दागिने होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह फिर्यादीच्या ताब्यात देण्यात आला. त्यावेळी फिर्यादीला त्यांच्या आईच्या अंगावर ४० हजार रुपये किमतीचे दागिने मिळून आले नाहीत. कोणीतरी अज्ञात इसमाने ते दागिने चोरून नेले अशी तक्रार फिर्यादीने केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.