- काळेवाडीत पोलिसांनी जप्त केले २१ रेमडेसिवीर इंजेक्शन..
- मेडिकल चालकासह इतर दोघांना बेड्या….
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. मे. २०२१) :- दोन इंजेक्शनची डिलिव्हरी घेऊन रविवारी पहाटे पावणेतीन वाजता दोघेजण दोन दुचाकीवरून काळेवाडी फाटा येथे सुरू असलेल्या नाकाबंदीमध्ये आले. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची तपासणी केली. त्यांच्याकडे दोन रेमडेसिवीर इंजेक्शन मिळून आले. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या विक्री परवानाबाबत त्यांच्याकडे मागणी केली असता, त्यांनी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा औषध विक्रीचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली.
त्यात ते मेडिकल चालकाच्या सांगण्यावरून ते इंजेक्शन विकण्यासाठी जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यापूर्वी देखील दोघांनी अशा प्रकारे इंजेक्शन विकून मेडिकल चालकाला पैसे आणून दिल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मेडिकल चालकाला ताब्यात घेतले. त्याच्या कारची (एम एच १४ / डी ए ४८८१) झडती घेतली असता सीटच्या खाली १९ रेमडेसीवीर इंजेक्शन पोलिसांना मिळाली. पोलिसांनी एकूण २१ रेमडेसीवीर इंजेक्शन जप्त केली.
शशिकांत रघुनाथ पांचाळ (वय ३४, रा. जयमल्हार नगर, दत्तकॉलनी, थेरगाव), कृष्णा रामराव पाटील (वय २२, रा. १६ नंबर बस स्टॉप, थेरगाव), निखील केशव नेहरकर (वय १९, रा. बिजलीनगर चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी शशिकांत याचे चिंचवड येथे आयुश्री मेडीकल आहे. आरोपी कृष्णा एका रुग्णालयात नर्सिंग स्टाफ आहे. तर आरोपी निखिल हा डिलिव्हरी बॉय आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.