- टोळीवर तब्बल १५ गंभीर गुन्ह्यांची नोंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मे. २०२१) :- संघटितपणे गुन्हे करणाऱ्या पिंपरी परिसरातील सराईत गुन्हेगार सचिन सौदाई आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली. पिंपरी – चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली असून, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी (दि.११) याबाबतचे आदेश दिले.
टोळीप्रमुख सचिन राकेश सौदाई (वय ३६), सनी ऊर्फ नितीन राकेश सौदाई, (वय ३०), अजय विजय टाक (वय २६), अनिल ऊर्फ बाबा ऊर्फ गोया सुशील पिवाल (वय ३१), तरुण ऊर्फ मोनू बिपीन टाक (वय ३०, सर्व रा. पिंपरी), जतिन ऊर्फ सोनू मुकेश मेवाती (वय २१, रा. बोपखेल), तौसिफ सय्यद (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), अशी आरोपींची नावे आहेत.
सचिन सौदाई आणि त्याच्या टोळीविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, कट रचून दरोडा घालणे, अपहरण, खंडणी मागणे, दुखापत, जबरी चोरी, बलात्कार, विनयभंग व बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे, असे एकूण १५ गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल आहेत. हे आरोपी गुन्हेगारी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली.
















