- जिल्ह्यातील कंपन्यांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा..
- उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटेंची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२१) :- सध्या पुण्यासह इतर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. पिंपरी चिंचवड शहरात ती दोनशेच्या आसपास स्थिरावली आहे. तसेच मोठ्या रुग्णालयांनी ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लँटची उभारणी केल्यामुळे रुग्णालयांना लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी ६० टक्क्यांनी घटली आहे. या बाबीची दखल घेत, राज्य शासनाने उद्योगांना लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावरील निर्बंध हटवून, उद्योगांना आधार द्यावा, अशी मागणी चाकण एमआयडीसी फेज ३ च्या उद्योजक संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार व जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Second Wave Of Corona) पुणे जिल्ह्यासह सर्वत्र रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून राज्य शासनाने पुढील आदेश येईपर्यंत औद्योगिक ऑक्सिजनचा पुरवठा (Shortage Of Medical Oxygen) बंद केला होता. जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी केवळ जिल्ह्यातच आणि तोही मान्यताप्राप्त कोविड रुग्णालयांनाच ऑक्सिजनचा पुरवठा करावा, असा आदेश दिला होता. औद्योगिक क्षेत्रास ऑक्सिजन वापरावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले होते. अशाने एकूण उत्पादनापैकी कोरोना रुग्णालयांमध्येच औद्योगिक कंपन्यामधील सुमारे ८० टक्के ऑक्सिजनची खपत होत होती.
गेल्या दोन महिन्यांमध्ये औद्योगिक कंपन्यांना लागणारा ऑक्सिजन पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे पिंपरी-चिंचवड, चाकण व पुणे जिल्ह्यातील सुक्ष्म, लघु व मध्यम अशा एकूण ५० हजाराहून अधिक कंपन्यांच्या उत्पादकतेवर परिणाम झालेला आहे. लेझर कटिंग व ऑक्सिजन कटिंग क्षेत्र तर पूर्णपणे कोलमडलेले आहे. त्यावरील कामगार बेरोजगार झाले आहेत. मात्र, आता कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे. रुग्णालयाची मागणीच नसल्यामुळे अनेक ॲाक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी आपले प्रोडक्शन प्लांट बंद ठेवलेले आहेत. त्यामुळे सरकारने औद्योगिक क्षेत्रासाठीचा ऑक्सिजन पुरवठा नियमितपणे सुरु करावा, असे या निवेदनात जयदेव अक्कलकोटे यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा सुज्ञ आहेत. त्यांना उद्योजकांच्या भावना कळतात. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने अजितदादांचे जिल्ह्यातील उद्योजकांना नेहमीच पाठबळ असते. त्यामुळे दादा आपण उद्योजकांच्या व्यथा समजवून औद्योगिक कंपन्यांना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा पुर्ववत सुरु करावा व आधीच आजारी अवस्थेततील संपूर्ण औद्योगिक क्षेत्राला चालना द्यावी.
– मा. जयदेव अक्कलकोटे (संस्थापक-अध्यक्ष – चाकण एमआयडीसी फेज ३ उद्योजक संघटना)…


















