- अति धोकादायक इमारतींना बजावणार नोटीसा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. जून. २०२१) :- शहरातील धोकादायक इमारतींचे महापालिकेच्यावतीने सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणामध्ये सापडणाऱ्या अति धोकादायक इमारती पाडण्याबाबत नोटीस बजावण्यात येणार आहे. नागरिकांनी त्या इमारती स्वतः न पाडल्यास महापालिकेकडून पाडल्या जातील. तसेच, त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे.
पावसाळा जवळ आल्याने सध्या शहरामध्ये पावसाळापूर्व कामे सुरू आहेत. महापालिकेच्या वतीने नाले सफाईची कामे केली जात आहे. त्याशिवाय, विविध प्रभागांमध्ये सांडपाणी जलवाहिन्या टाकणे, आदी कामे सुरू आहेत. शहरातील विविध भागांमध्ये जुन्या इमारती आहेत. त्यातील काही इमारती धोकादायक स्थितीत आहेत. या इमारतीची डागडुजी करण्याची गरज आहे. तर, काही इमारती पाडून पुन्हा नव्याने उभाराव्या लागणार आहेत. पावसाळ्यात अशा धोकादायक इमारतीच्या बाबतीत दुर्लक्ष करणे महाग पडू शकते. त्यामुळे दुर्घटनेस निमंत्रण मिळू शकते. या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाने सध्या क्षेत्रीय कार्यालयनिहाय धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले आहे.
इमारत पाडण्याचा खर्च संबंधित नागरिकांकडून वसूल केला जाणार आहे. सर्वेक्षणामध्ये ज्या इमारतींची दुरूस्ती शक्य आहे. अशा इमारतींना दुरूस्तीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. एखाद्या इमारतीत भाडेकरू राहण्यास असतील आणि मालक त्या इमारतीच्या दुरूस्तीला परवानगी देत नसेल तर स्वतः भाडेकरू महापालिकेकडे अर्ज करून इमारतीची दुरुस्ती करू शकणार, अशी माहिती स्थापत्य विभागातील सूत्रांनी दिली.

















