- बँक खाते अपडेट असणाऱ्या रिक्षा चालकांच्या खात्यात रक्कम जमा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. जून. २०२१) :- राज्य शासनाने परवानाधारक रिक्षा चालकांसाठी जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्यासाठी आतापर्यंत पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ९ हजार २४१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६ हजार ३६ अर्जाना मान्यता देण्यात आली आहे. तर १ हजार ३६९ अर्ज फेरतपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. याशिवाय ६ अर्ज नाकारण्यात आले आहेत.
राज्य सरकारकडून परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून दीड हजार रुपये अर्थ सहाय्य देण्यासाठी २ हजार १८० कोटी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. पात्र रिक्षा चालकांना हा लाभ मिळत आहे. याबाबतची कार्यप्रणाली आयसीआयसीआय बँकेमार्फत विकसित करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील रिक्षा संघटना प्रतिनिधींना अर्ज प्रक्रियेबाबत ऑनलाइन सादरीकरण देखील करण्यात आले आहे. ज्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांच्या बँक खात्यात अर्थसहाय्य जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे.
पिंपरी – चिंचवड शहरात एकूण २१ हजार अधिकृत परवानधारक रिक्षा आहेत. या सर्व रिक्षाचालकांनी ऑनलाइन पद्धतीने सर्व सोपस्कर पार पाडल्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर परिवहन विभागाच्या वतीने दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. शहरातील अधिकृत रिक्षा संख्येचा विचार करता, एकूण ३ कोटी १५ लाखांचा निधी शहरात वितरित होऊ शकतो.

















