- आता नवीन वाहनांची नोंदणी शोरूममध्येच होणार; राज्याचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जून २०२१) :- दुचाकी व चारचाकी नव्या वाहनांची नोंदणी आता संबंधित वाहनविक्रेत्यांकडे (शोरूम चालक) होणार आहे. आरटीओकडे वाहनाची नोंदणी होणार नाही. राज्याच्या परिवहन विभागाने (आरटीओ) तसा निर्णय घेतला असून, येत्या चार ते पाच दिवसांत त्याची अंमलबजावणी होणार आहे.
यामुळे व्हीआयपी क्रमांक वगळता उर्वरित क्रमांक ” ऑटोजनरेट ‘ पद्धतीने मिळतील. यात कुणाचा हस्तक्षेप असणार नाही. राज्याच्या परिवहन विभागाने अमलबजावणीचे आदेश राज्यातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांना दिले आहेत.
परिवहनेतर वाहन विभागातील म्हणजे नॉन ट्रान्सपोर्ट वाहनाची नोंदणी वाहन घेताना शोरूममध्येच केली जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्राने आपल्या वाहन प्रणालीत आवश्यक ते बदलदेखील केला आहे. नोंदणी करताना वाहनाच्या चेसीचा क्रमांक, वाहनाचा फोटोसह आवश्यक ती कागदपत्रे ऑनलाइन सबमिट करावी लागणार आहे. हे सर्व काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच याची अंमलबजावणीस सुरुवात होईल.