न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ३ जाने.) :- चिखली – कुदळवाडी परिसरातील स्पाईन रोड, मैला शुध्दीकरण प्रकल्पाजवळ असलेल्या रस्त्यावरील झाडांना महापालिके च्या वतीने वृक्ष संरक्षक जाळी (ट्रि गार्ड) लावलेली आहे. वाढ होऊनही बऱ्याच दिवसांपासून या झाडांची वृक्ष संरक्षक लोखंडी जाळी काढण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या वृक्षास इजा पोहचत होती.
याची दखल घेत चिखली-कुदळवाडीतील स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी मनपाचे उद्यान अधिकारी सुरेश घोडे यांना घटनास्थळी बोलावून परिस्थितीची जाणीव करून दिली व वृक्ष संरक्षक जाळी (ट्रि गार्ड) हटवण्याची सूचना केली होती.
या मागणीची दखल घेत, महापालिकेच्या उद्यान विभागाकडून गुरुवार (दि. ३) रोजी परिसरातील सर्व झाडांना लावण्यात आलेली वृक्ष संरक्षक जाळी (ट्रि गार्ड) हटविण्यात आली आहे. त्यामुळे झाडांना मोकाळा श्वास घेता येणार आहे. या कार्यवाहीचे चिखली-कुदळवाडी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.











