- पिंपरीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२१) :- अवैधरित्या दुर्मिळ कासवाची विक्री करणारा संशयित व्यक्ती मानकर चौक, वाकड येथे येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षकांना मिळाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी साध्या वेषात सापळा रचून आरोपीचा पाठलाग केला. पिंपरीतील मैत्री चौक, तुकारामनगर येथील हॉटेलमध्ये अवैधरित्या कासव खेरदी विक्रीचा व्यवहार चालू असताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेतले.
वनविभागाच्या महिला वनअधिकारी व इतर वनकर्मचारी यांनी आरोपींच्या राहत्या घराची झडती घेतली असता एकाच्या घरी छोटया बॉक्समध्ये दोन कासव मृत अवस्थेत व एक जिवंत आढळून आले. हे कासव इंडियन टेन्ट टर्टल आणि इंडियन रूफेड टर्टल या प्रजातीचे अनुसूची प्रकार-१ मधील संरक्षित कासव असून ते दुर्मिळ प्रकारातील आहे.
आरोपीविरुद्ध अवैधरित्या कासव बाळगणे, विक्री करणे प्रकरणी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे अन्वये गुन्हा नोंदविला आहे. अथर्व शशिकांत देशमुख व श्रीकृष्ण अवधूत वंजारी असे अटक केलेल्या व्यक्तींची नावे असून, त्यांना न्यायालयाने ३ जुलैपर्यंत वन कोठडीत पाठविले आहे.