- पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची मंजुरी..
- सामाजिक सुरक्षाचे विठ्ठल कुबडे यांचा प्रमुख पदाचा पदभार काढला..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहर पोलिस दलातील ३९० कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. सेवाज्येष्ठतेनुसार ही बढती देण्यात आली आहे. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मंगळवारी (दि. २९) त्यास मंजुरी दिली.
पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांच्या निवडसूचीनुसार त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये ९५ पोलिस हवालदारांना सहायक फौजदारपदी बढती देण्यात आली आहे. पोलिस नाईक असलेल्या ११५ जणांना पोलिस हवालदार तर पोलिस शिपाई असलेल्या १८० जणांना पोलिस नाईक म्हणून बढती देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अवैध धंद्यांचे कंबरडे मोडणाऱ्या सामाजिक सुरक्षा पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सहायक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्याकडे या पथकाची धुरा सोपविण्यात आली आहे. तसेच, डोंगरे हे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे वाचक म्हणून देखील कर्तव्य पाहणार आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्याकडे सध्या जनसंपर्क अधिकारी या एकाच पदाची जबाबदारी आहे. मात्र आगामी काळात त्यांना पोलिस ठाण्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तरीही अचानक झालेल्या या बदलीमुळे शहर पोलीस दलात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.