- स्थायीचे कामकाज गुंडाळून सभापतींसह अधिकाऱ्यांचा इंदूर दौरा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२१) :- कचराकुंडीमुक्त पिंपरी – चिंचवड शहर संकल्पनेसाठी महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे, सदस्य शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय हे इंदूर शहर दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे बुधवार (दि.३०) स्थायी समिती सभा तहकूब करण्यात आली.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात मध्य प्रदेश राज्यातील इंदूर शहर हे अव्वल क्रमांकाचे पुरस्कारप्राप्त स्वच्छ शहर आहे. तेथील घनकचरा व्यवस्थापन, कचराकुंडीमुक्त अभियान आदींबाबत अभ्यासासाठी हा अधिकृत दौरा पालिकेने आयोजित केला आहे. त्यानुसार पिंपरी – चिंचवड शहरात घनकचरा व्यवस्थापन राबविले जाणार आहे. हा दौरा गुरुवार (दि. १) व शुक्रवार (दि. २) असा दोन दिवसांचा आहे.
पिंपरी – चिंचवड शहर अधिक स्वच्छ करण्यसाठी इंदूर शहराचा अभ्यास दौरा आयोजित केला आहे. तेथे यशस्वी झालेली घनकचरा व्यवस्थापनासह कचराकुंडीमुक्त संकल्पना पिंपरी – चिंचवड शहरात राबविली जाणार आहे. त्यादृष्टीने पालिका प्रशासन नियोजन करीत आहे, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.