- सांगवीतील घटना; एकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२१) :- आरोपीच्या प्रेयसीला एकाने पळवून नेले. या कारणावरून आरोपींनी आपसात संगणमत करून तरुणाचा मुंबई येथील पत्ता माहिती करून घेण्यासाठी ३१ जुलै २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता कान्हेगाव रेल्वे स्टेशन समोरून अपहरण केले. त्यानंतर मुळा नदीच्या पात्राजवळ वाकड येथे असलेल्या एका भंगाराच्या दुकानात आणून त्याला मारहाण केली.
आरोपीने तरुणाचे यांचे पाय पकडले. बाकी दोन आरोपी यांनी हात पकडले. त्यानंतर मुख्य आरोपीने तरुणाचा गळा आवळून खून केला. ओळख पटू नये यासाठी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे सर्व कपडे काढून मृतदेह एका पोत्यात घालून पोत्याचे तोंड बंद न करता मुळा नदीच्या पात्रात वाकड येथे टाकून दिला. धीरज मायराम नागर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सुरज उर्फ सोन्या अरविंद जगताप (वय ३५, रा. गांधी नगर झोपडपट्टी देहूरोड), अरिफ सिद्दीक शेख (वय ३२, रा. पडवळ नगर, थेरगाव), सागर सुरेश जगताप (वय ३०, रा. थेरगाव), चेतक नेपाळी (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सुरज जगताप याला ताब्यात घेतले आहे. हा गुन्हा सांगवी पोलिसांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.