- वास्तुविशारदाचीही नेमणूक; वारकरी सुखावणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जुलै २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिका आळंदी व देहू रस्त्याच्या प्रवेशद्वारावर स्वागत कमान उभारणार आहे. या कामाअंतर्गत देहू येथे महापालिका हद्दीवर कमान उभारण्यासाठी वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना निविदा स्वीकृत रकमेच्या १.९५ टक्के शुल्क देण्यात येणार आहे.
या रस्त्यावर महापालिका हद्दीत देहूकडून येताना तळवडे परिसराच्या सुरुवातीस स्वागत कमान उभारण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे. महापालिका हद्दीलगत पूर्वेस आळंदी आणि पश्चिमेस देहूगाव अशी दोन तीर्थक्षेत्रे आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी, भाविक आळंदी आणि देहू येथे येत असतात.
सद्यस्थितीत देहू – आळंदी हा मार्ग बीआरटीएस विभागामार्फत विकसित केला आहे. याच मार्गावरून भाविक आळंदी ते देहू असा पायी प्रवास करतात. महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यांतूनही या तीर्थक्षेत्रास भेट देण्यासाठी वारकरी येत असतात. त्यांचा या मार्गावरील बहुतेक सर्वच प्रवास पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतून होत असतो.