न्युज पीसीएमसी नेटवर्क : मुंबई : मंगळवारी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या बैठकीत पवार यांनी भाजपकडे भरपूर पैसे आहेत; पण आपल्या पक्षाची तशी अवस्था नाही. राष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट असल्याची स्वत:हून त्यांनी कबुली दिली. आगामी निवडणुकीत तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी यापूर्वी केलेली कामे, माऊथ पब्लिसिटी आणि सोशल मीडियाद्वारे प्रचार करा असे आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळे बैठकीसाठी आलेल्या सर्व नेत्यांच्या आणि पदाधिकार्यांच्या भुवया उंचावल्या. सन १९९९ ते २०१४ अशी १५ वर्षे सलग सत्ता उपभोगणार्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्ष स्थापनेच्या दोन दशकातच पैशांची मोठी चणचण भासू लागली आहे.
निवडणुका म्हटल्या की पैसा आणि पैशाची होणारी उधळपट्टी आपणा सगळ्यांना माहीत आहेच. नुसती आमदारकी जरी लढवायची असेल तर करोडो रुपयांचा चुराडा होतो. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात न राहिलेला हा निवडणूक खर्च आता मोठ्या पक्षांचा चिंतेचा विषय ठरला आहे. काँग्रेससोबत इतकी वर्ष राज्यात आणि केंद्रात सत्ता उपभोगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला होणार्या खर्चामुळे चिंता वाढली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे १५ वर्ष मंत्री राहिलेले अनेक दिग्गज आमदार आणि विद्यमान नेतेही पक्षाला निधी देत नाहीत. आपापली प्रॉपर्टी वाढवण्यात धन्यता मानणारे अनेक नेते अजूनही पक्षात महत्त्वाच्या पदांवर बसून असल्याची खंत राष्ट्रवादीच्या एका तरूण कार्यकर्त्याने न्युज पीसीएमसीशी बोलून दाखवली. केवळ पवार घराण्याशी संबंधित काही मोजके व्यावसायिकच पक्षाच्या मागे उभे असल्याचेही तो म्हणाला.
















