- कलेचे अनेकविध पदर उलगडत विद्यार्थ्यांनी सादर केली महाराष्ट्राची लोकधारा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जाने.) :- छोट्या कलाकारांनी कलेचे अनेकविध पदर उलगडत कोळीगीते, भावगीते, लावणी, पेरणीची गाणी, वासुदेव, भलरी अशा विविधढंगी गाण्यांच्या तालावर नृत्य सादर करीत महाराष्ट्राची लोकधारा साक्षात उभी केली. निमित्त होते, जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडियम स्कूल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयाचे पिंपळे गुरवमधील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित स्नेहसंमेलनाचे.
महाराष्ट्राची लोकधारा, महाराष्ट्राची संस्कृती लोप पावत चालली आहे. या संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित विविध गीते विद्यार्थ्यांनी सादर केली. त्याला उपस्थितांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सर्वांनी कौतुक केले. आपल्या पाल्यातील विविध सांस्कृतिक आविष्कार पाहून पालकही हरखून गेले.
यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतूल शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, मधू दाणी, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.
या स्नेहसंमेलनात लिटल फ्लॉवर स्कूलच्या चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांचा आविष्कार दाखवत उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी जवान, समाजसेवक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक अशी वेषभूषा करीत नृत्य सादर केले. याबरोबरच भारतीय विद्यानिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी.., आम्ही ठाकर ठाकर.., नाचतो डोंबारी गं नाचतो डोंबारी.., सुरु झालीया पेरणी…, कोळी नृत्य, बानूबाई-खंडोबाची गाणी…, ऐका दाजिबा अशा विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरुन दाद दिली. या नृत्यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. या गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली. लावणीही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेली.
ईश्वरी चव्हाण, अरुण अडगळे, अशोक विश्वकर्मा, मुबारक शेख यांनी नृत्यदिग्दर्शन केले. सूत्रसंचालन तन्मयी जोशी, शुभदा जाधव, हर्षदा जठार, संतोषी देवशी, विशाखा भगत, स्वाती तोडकर, आकांक्षा जाधव, प्राची यादव यांनी केले.


















