- वारकरी व विश्व हिंदू परिषद राज्यभर जनजागृती करणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जुलै. २०२१) :- महाराष्ट्राचे ज्येष्ठ किर्तनकार हभप बंडातात्या कराडकर यांची नजर कैदेतून सुटका करावी. मानाच्या पालखी सोबत किमान दहा वारक-यांना कोरोनाचे नियम पाळून सहभागी होण्याची परवानगी द्यावी. या वारकरी सांप्रदायाच्या माफक मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे.
जे मुघलांना, इंग्रजांना जमले नाही ते महाविकास आघाडी सरकारने करुन दाखविले. याविषयी नागरीकांमध्ये जाऊन जगजागृती करण्यासाठी शनिवारी (दि. १७ जुलै) राज्यभरातील वारकरी आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते राज्यातील सर्व गावांमध्ये मंदिरांबाहेर, सरकारी कार्यालयासमोर बसून नागरीकांचे प्रबोधन करतील. यानंतर उद्भवणा-या परिस्थितीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्यांचे सरकार जबाबदार राहिल. असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र, गोवा क्षेत्रमंत्री शंकर गायकर यांनी केले. वारक-यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशीही मागणी हभप पांडूरंग शास्त्री शितोळे महाराज यांनी यावेळी केली.
गुरुवारी (दि. १५ जुलै) चिंचवड गावात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायकर बोलत होते. यावेळी वारकरी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष हभप पांडूरंग शास्त्री शितोळे महाराज, चिंचवड अध्यक्ष शरद इनामदार, विजयराव देशमुख, विभाग मंत्री नितीन वाटकर, जिल्हा मंत्री संजय शेळके, चिंचवड कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, बजरंग दलाचे विभाग सह संयोजक कुणाल साठे, बजरंग दलाचे विभाग संयोजक संदेश भेगडे, पुणे ग्रामिण जिल्हा मंत्री दयानंद शिंदे आदी उपस्थित होते.












