- ४० वारकऱ्यांचा समावेश..
- यंदाही देहूत हरिनामाचा नाद निनादलाच नाही..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२१) :-जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका आषाढी वारीसाठी शिवशाही बसने आज सोमवार सकाळी ९ वाजता पोलीस बंदोबस्तात मार्गस्त झाल्या, अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी दिली.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूतील सर्व प्रमुख रस्ते बंद केले असून, गावात संचारबंदी लागू करण्यात आली असून, सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतूक बाह्यवळण मार्गानी वळविण्यात आली आहे. पादुकासोबत पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे यांच्यासह संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे विश्वस्थ माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे व विशाल महाराज मोरे शिवशाही बसमध्ये यांचा समावेश आहे.
या सोहळ्यासाठी इन्सिडन्स ऑफिसर म्हणून हवेलीचे प्रांत सचिन बारवकर यांची नियुक्ती करण्यात आली असून संपूर्ण पालखी सोहळ्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. पादकांसमवेत संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त २, चोपदार, विणेकरी, पालखीचे २ भोई, चौघडा, शिगाडे, अब्दागिरी, गरूडटक्का, छत्री, जरीपटका व ४ पताकाधारक वारकरी, २ पखवाज वादक व टाळकरी असे ४० वारकरी असा लवाजमा शिवशाही बसमधून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे.