- पालिका आवारात उलटसुलट चर्चांना उधान..
- प्रशासनाच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. जुलै. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ‘ ड ‘ वर्गातील कर्मचाऱ्यांना सक्तीचे केले आहे. मात्र, आस्थापनेवरील चर्तुर्थ श्रेणी वर्गातून लिपिक पदावर पदोन्नती मिळविलेल्या कर्मचा-यांनी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर करून, पदोन्नती मिळविल्याची तक्रार आयुक्तांना प्राप्त झाली होती.
आयुक्तांनी सर्वच कर्मचाऱ्यांचे टंकलेखन प्रमाणपत्रे हे पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे खातरजमा करण्यासाठी पाठविली होती. त्यात २५ कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळून आले. त्यात रखवालदार, शिपाई, मजूर, सफाई कामगार, वार्ड आया, कुली यांचा समावेश आहे. पालिकेची फसवणूक केल्याने त्यांचे पदावतन करून खातेनिहाय चौकशी सुरू केली होती. मात्र, या काळात सुमारे १७ महिने त्यांनी लिपिक म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा कारवाई करता येत नसल्याचा दावा करीत पालिका प्रशासनाने त्यांना सक्त ताकीद दिली आहे. तसेच, त्यांच्याकडून टंकलेखन परीक्षेचे नव्याने प्रमाणपत्र घेण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले आहेत.
या कर्मचा-यांनी महापालिकेची दिशाभूल व फसवणूक करून, लिपिक पदावर पदोन्नती घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई न करता केवळ सक्त ताकीद देऊन सोडून दिल्याने संशयाला जागा उरते आहे. त्यामुळे पालिका आवारात उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे.