- शहरातील फ्रंट लाईन व आरोग्य कर्मचारी कोविडच्या दुसऱ्या डोसपासून वंचित..
- पालिका आयुक्तांची भूमिका संशयास्पद; शिवसेनेच्या विजय गुप्तांचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२१) :- कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर जायबंदी झाले आहे. या संकटाविरुद्ध पालिकेचा आरोग्य व वैद्यकीय विभाग, पोलीस यंत्रणासह अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. या ‘रिअल हिरों’च्या जोरावरच कोरोनाविरुद्धची लढाई आपण यशस्वी करण्याचा प्रयत्न करतोय. शहर तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. शहरातील फ्रंट लाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी व पॅरामेडिकल स्टाफ अशा तब्बल ३८ हजारांपेक्षा जास्त योद्ध्यांनी कोविडचा दुसरा डोसच घेतलेला नाही. उपचार करणाऱ्यांचेच लसीकरण शंभर टक्के पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आपण तिसरी लाट रोखणार कशी? असा सवाल शिवेसेनेचे पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २,६२,९९९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे ४,३२५ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. कोरोनावर अद्यापही ठोस उपचारपद्धती नाही. गंभीर परिणामांना रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. १६ जानेवारीपासून शहरात लसीकरणाला सुरुवात झाली. शहराचा लसीकरणाचा आकडाही दहा लाखांच्या घरात पोहोचतोय. तज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. यात डॉक्टर आणि परिचारिका यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. असे असताना शहरातील हेल्थ केअर वर्कर्स ‘ व ‘ फ्रंटलाईन वर्कर्स चे १०० टक्के लसीकरण झालेले नाही. ही बाब धोकादायक आहे.
शहरातील ४१८२४ ‘ फ्रंटलाईन वर्कर्स’ ने कोविडचा पहिला डोस घेतला, त्यातील फक्त १६,६८२ जणांनीच दुसरा डोस घेतलाय. प्रथम डोस घेतलेल्या ३०११३ आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी फक्त १६४३३ जणांनी दुसरा डोस घेऊन स्वतःला सुरक्षित केलयं. उपचार करणाऱ्यांचीच सुरक्षाच रामभरोसे झालीय. त्यामुळे तिसरी लाट रोखणार कशी?, असा सवाल उपस्थित होतोय. पालिका आयुक्तांची भूमिकादेखील बुचकळ्यात टाकणारी आहे. डोस बाकी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ पगार स्थगितीचा इशारा दिलाय. त्यांनी कारणाच्या मुळाशी जाऊन हा गुंता सोडविणे महत्वाचे आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत या दोन्ही गटात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास, कठीण परिस्थिती निर्माण होईल, त्याला जबाबदार आयुक्तच असतील, असे या पत्रकात गुप्ता यांनी म्हटले आहे.
हेल्थ केअर वर्कर्स व फ्रंटलाईन वर्कर्समध्ये दुसऱ्या डोसप्रती उदासीनतेचे कारण स्पष्ट झाले नाही. आजपर्यंत महापालिका व इतर आस्थापनांवरील ७१ हजार ९३८ आरोग्य कर्मचारी आणि हेल्थवर्कर यांनी पहिला डोस घेतलाय तर, दुसरा डोस फक्त ३३ हजार ११५ लोकांनी घेतलाय. शंभर टक्के लसीकरण झाले नाही. प्रशासनाकडून किंवा संबंधित विभागाकडूनही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. ज्यांनी लस घेतलीच नाही किंवा दुसऱ्या डोसपासून अद्यापही दूर आहेत, त्यांच्यामध्ये लसीकरणाविषयी जनजागृती करण्याची गरज आहे.
– मा. विजय गुप्ता – शिवसेना समन्वयक, पिंपरी विधानसभा…












