- सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या सहा जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२१) :- रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलेल्या सहा गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. हे गुन्हेगार पिस्तूल घेऊन वाढदिवस साजरा करण्यासाठी शुक्रवारी एकत्र आले होते. टोळीच्या म्होरक्याचा वाढदिवस साजरा करून हे आरोपी प्रतिस्पर्धी टोळीला रिप्लाय देणार होते.
अनिरुद्ध ऊर्फ विकी ऊर्फ बाळा राजू जाधव (वय २४, रा. जाधववस्ती, रावेत), धिरज दीपक जयस्वाल (वय २६, रा. रस्टन कॉलनी, बिजलीनगर रोड, दत्तमंदिराजवळ, चिंचवड), रोहन राजेंद्र कांबळे (वय २४, रा. गिरीराज हौसिंग कॉम्लेक्स, बिजलीनगर, चिंचवड), अमित भगिरथ मल्लाव (वय २६ बिजलीनगर चिंचवड), मंगेश देवीदास नाटेकर (वय २२, रा. रमाबाईनगर, रावेत), अक्षय लहु चौगुले (वय २३, रा. रस्टन कॉलनी, बिजलीनगर रोड, दत्त मंदीराजवळ, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अटक अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावण टोळीचा पूर्वीचा म्होरक्या मयत अनिकेत जाधव याचा जन्मदिवस केक कापून साजरा करुन विरोधी टोळीला रिप्लाय देणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार शुभम कदम यांना मिळाली. त्यामुळे गुंडा विरोधी पथकाने जाधववस्ती, रावेत येथे अनिकेत जाधव याच्या घराला वेढा घातला. अनिकेत जाधव याच्या घरासमोर सहा जण आले असता पोलिसांनी छापा टाकून रावण टोळीच्या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये रावण टोळीचा प्रमुख आरोपी व मयत अनिकेत जाधव याचा भाऊ अनिरुध्द ऊर्फ विकी ऊर्फ बाळा राजू जाधव हा देखील होता. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा आढळला. पोलिसांनी पिस्तुल आणि काडतुसे जप्त करून सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या.