- चिंचवडमध्ये कष्टकरी कामगार संवादाला पाटील यांची उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड ही कामगार नगरी आहे. येथील कष्टकरी कामगारांना कष्टकरी संघर्ष महासंघ एकसंघ करून त्यांना न्याय हक्क मिळवून देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनेही या कामगारांना न्याय देण्याची भूमिका घेऊ. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसने नेत्रदीपक विकास केला असून अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पुन्हा यश संपादन करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज, शुक्रवारी रोटरी क्लब थरमॅक्स चौक चिंचवड येथे कष्टकरी कामगार संवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी,आदींसह पुणे जिल्ह्यातिल कष्टकरी कामगार उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रवादी हा कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे. या पक्षात कार्यकर्त्याला योग्य पद्धतीने संधी दिली जाते. येणा-या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भरगोस यश संपादन करेल. याप्रसंगी रिक्षाचालक, फेरीवाला, बांधकाम कामगार, घरेलू कामगार यांना सुमारे एक कोटी रुपयांच्या लाभाच्या वितरणाची सुरुवात करण्यात आली. जयंत पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.