- ‘ ह ‘ क्षेत्रीय कार्यालयाच्या बैठकीत नगरसेवकांकडून समस्यांचा पाढा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२१) :- डेंग्यू, तापाच्या पार्श्वभूमीवर रोगाचा प्रसार टाळण्यासाठी आरोग्य विभागाने शहरात सर्वत्र डास प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करून पूर्तता अहवाल सादर करावा, असे आदेश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रभाग अध्यक्ष, नगरसदस्य, नगरसदस्या आणि वरिष्ठ अधिका-यां समवेत झालेल्या बैठकीमध्ये महापौरांनी आदेश दिले.
यावेळी प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, नगरसदस्य अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, राजू बनसोडे, शाम लांडे, नगरसदस्या सिमा चौगुले, स्वाती उर्फ माई काटे, आशा धायगुडे-शेंडगे, माधवी राजापुरे, स्वीकृत नगरसदस्य माऊली थोरात, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात आदी उपस्थित होते.
बैठकीत नगरसदस्यांनी विविध समस्या मांडल्या. कचरा गाड्या वाढवून देणे, कंत्राटी कामगारांना वेळेत पगार मिळत नाही अशा तक्रारी येत आहेत, स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा करणे, दापोडीसाठी स्वतंत्र पाईप लाईन देणे, ड्रेनेज लाईन साफ करणे असे सांगून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, मंडई येथील समस्या, अतिक्रमण समस्या सोडवाव्यात, धोकादायक झाडांची छाटणी करणे आदी मागण्या देखील यावेळी नगरसदस्यांनी केल्या.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, अस्वच्छ व विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी. वॉर्डातील कर्मचा-यांची संख्या वाढविण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. क्षेत्रीय कार्यालये कचरा कुंडी विरहित करण्याचे
महानगरपालिकेचे नियोजन आहे. प्रभागातील मोकाट कुत्रांबाबत पशुवैद्यकीय विभागाने तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिले. तसेच शहरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत संबधित विभागांनी जागृत राहावे असेही महापौर माई ढोरे यावेळी म्हणाल्या.












