- टोळीवर गंभीर गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२१) :- अनेक गुन्हे दाखल असलेल्या गायकवाड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अन्वये कारवाई करण्यात आली. या टोळीमध्ये औंध परिसरातील प्रसिद्ध उद्योजक नानासाहेब गायकवाड, त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांच्यासह अन्य तिघांचा समावेश आहे.
पिंपरी- चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी याबाबत मंगळवारी (दि.३) आदेश दिले. टोळी प्रमुख गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (वय ३६), नानासाहेब शंकर गायकवाड (दोघे रा. आयटीआय रोड, औंध, पुणे), गणेश ज्ञानेश्वर साठे (वय ३५, रा. पिंपळे निलख), राजूदादा अंकुश (रा. पिंपळे गुरव), दीपक गवारे (रा. शिवाजी नगर, पुणे) या टोळीविरोधात कारवाई केली.
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले की, सराईत गणेश गायकवाड, नानासाहेब गायकवाड आणि टोळीवर खुनाचा प्रयत्न, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करणे, बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, अनैसर्गिक संभोग करून खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे असे गुन्हे पिंपरी – चिंचवड पुणे शहर व पुणे ग्रामीणच्या हद्दीतील पोलीस ठाण्यात दाखल आहेत.












