- निर्मितीस्थळाला महापौरांची भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑगस्ट २०२१) :- मोशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा शंभर फुटी पुतळा उभा करण्यात येणार आहे. शंभूराजांचा व देशातील सर्वात मोठा पुतळा उभारण्याचा मान पिंपरी चिंचवड शहराला मिळणार आहे. या पुतळ्याचे शिल्पकार होण्यासाठी देशातील मानांकित शिल्पकारांनी इच्छा व्यक्त केली होती. गुजरात येथील ‘ स्टॅच्यू ऑफ युनिटी ‘ सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा साकारणारे शिल्पकार राम सुतार हे या पुतळ्याची निर्मिती करणार आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात बो-हाडेवाडी येथे सुमारे १०० फुट उंचीचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा व ४० फुटी चौथरा व संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित म्युरल्सद्वारे जीवनपट उलगडण्यात येणार आहे.
या नियोजित छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या कामकाजाची पाहणी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केली. यावेळी समवेत उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, नगरसेविका अश्विनी जाधव, सारिका सस्ते, कार्यकारी अभियंता आबासो ढवळे उपस्थित होते.