- ‘दादां’ना डावलून शहरातील समस्या थेट बारामतीत पेश..
- पक्ष सत्तेपासून कोसो दूर तरीही, गटबाजीला उधान?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड शहर म्हटलं की, अजितदादा पवार असे सत्तासमीकरण ठरलेलंच. अजितदादांनी पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता पुन्हा खेचून घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणते नेते काम करत आहेत, कोणते नेते काम करत नाहीत, कोणत्या नेत्यांमध्ये आपसात भांडणे आहेत, कोणते पदाधिकारी पक्षासाठी फायदेशीर ठरणार आहेत; तसेच सध्या कोणते कार्यकर्ते पक्षाचे जोमाने काम करत आहेत, याची सर्व संकलित माहितीही त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे. या गटबाजीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस लक्ष ठेवून आहे. भाजपच्या नाराज गटाला आणि नाराज नगरसेवकांना चुचकारण्याचा प्रयत्नही ‘राष्ट्रवादी’कडून सुरू आहे. एवढेच नाही, तर भाजपमध्ये गेलेल्या काही नगरसेवकांच्या घरवापसीसाठीही ‘राष्ट्रवादी’कडून प्रयत्न सुरू आहेत. यात अजितदादांची पडद्यामागची भूमिकाही महत्वाची ठरतेय.
मात्र, शहरातील दोन मातब्बर नेते (एक आजी व दुसरे माजी आमदार) यांची नौका मात्र भलत्याच दिशेने नौकानयन करताना दिसतेयं. या दोघांनी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बारामती येथे नुकतीच भेट घेतली. भेटीदरम्यान शहरातील विविध प्रश्नांवर सर्वांगीण चर्चा झाल्याची माहितीही या दोघांनी पत्रकारांना दिली. बोपखेलच्या रस्त्याचा प्रश्न. पिंपरी रेल्वे स्टेशन लगत असलेल्या डेअरी फार्मची जागा रेल्वे प्रशासनाला देऊन त्या ठिकाणी सुसज्ज जंक्शन उभारणी, शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, भाजपने चालवलेला सावळा कारभार आदी मुद्दे या आजी-माजी आमदारांनी पवार यांच्यासमोर मांडले.’ त्यावर मी स्वतः शहरासाठी वेळ देईन’, असे आश्वासन साहेबांनी दिल्याचे या आजी-माजी आमदारांनी सांगितले.
मुळात शहराच्या राजकारणात अजितदादांचे नेतृत्व व त्यांचा शब्द डावलण्याइतपत धाडस पक्षातील कोणत्याच नेत्यात नाही. ते म्हणतील तशी राष्ट्रवादीची पूर्वदिशा ठरते. आगामी पालिका निवडणुकीचे पडघम वाजत असताना अजितदादांचे नेतृत्व या दोन्ही आजी-माजी नेत्यांना अमान्य आहे का? की त्यांना अजितदादांकडूनच डावलण्यात येतंय. हे दोन्ही नेते उपद्रवी नसले तरी, त्यांच्या प्रभावाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याचा नमुना या दोन्ही नेत्यांनी नुकताच पेश केलाय. साहेबांचे शहरात लक्ष म्हणजे अधिकारावर गदा. मात्र, शहराचे कारभारी अशी ओळख असणारे अजितदादा राजकारणातील मुरब्बी नेता म्हणून ओळखले जातात. स्थानिक निवडणुकीत स्थानिक नेत्यांकडे दुर्लक्ष करण्याइतपत राष्ट्रवादी दुधखुळी नाही. मात्र पॅचअपची गरजेचे आहे. अन्यथा ऐनवेळी चुचकरण्याची खेळी पक्षाच्याच अंगलट येऊ शकते, अशी कुजबुज खुद्द शहर राष्ट्रवादीच्या गोटातच सुरु असल्याची माहिती मिळतेय.











