- पिंपरी चिंचवड शहरात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे महापौरांचे फर्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२१) :- यंदाचा गणेशोत्सव कोविड १९ च्या नियमांचे पालन करुन पर्यावरणपूरक उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करण्याचे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
दरवर्षी पिंपरी चिंचवड शहरामध्ये उत्साही व आनंदी वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता हा सण साधेपणाने व आनंदाने साजरा करावा असे आवाहनही महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांनी शाडू माती अथवा कागदी लगद्या यांसारख्या विघटनशील घटकांपासून बनविलेल्या गणेशमूर्तींची स्थापना करावी. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींची उंची ४ फुटा पर्यंत असावी तर घरगुती गणेश मूर्तींची उंची २ फुटा पर्यंत असावी. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (POP) पासून बनविलेल्या गणेश मूर्तींच्या विसर्जनास प्रतिबंध आहे. घरगुती आरास व देखाव्यांसाठी प्लास्टिक, थर्माकोल व पर्यावरणास हानिकारक वस्तूंचा वापर करू नये असेही आवाहन त्यांनी केले.
नागरिकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन घरच्या घरी करावे. कोव्हिड-१९ प्रादुर्भाव व संसर्ग टाळणेसाठी गर्दी होऊ नये याकरिता गणेश विसर्जनासाठी यावर्षी कृत्रिम गणेश विसर्जन हौद उपलब्ध करून देण्यात येणार नसून त्याएवेजी महानगरपालिकेच्या वतीने गणेश मूर्तीदान व निर्माल्य दान स्वीकारण्यासाठी फिरत्या रथांची व्यवस्था शहरातील विविध भागांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी दिली.
आरती, भजन, किर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करणेस सक्त मनाई आहे. गणेश मंडळांनी श्रींची आरती व दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करावे. कोरोना-१९ विषाणू प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर श्रींच्या आगमनाच्या व विसर्जनाच्या मिरवणूका काढण्यास सक्त मनाई आहे. तसेच गणेश मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करून घेण्यात यावे. थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी, शारीरिक अंतराचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. स्वच्छतेचे नियम पाळण्यावर विशेष लक्ष देण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार पाण्याचा स्त्रोत दुषित करणे हा दंडनीय अपराध आहे. त्यामुळे नदीचे पाणी दुषित न होणेकामी सर्व नागरिकांनी व गणेश मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.












