- ‘त्या १६ जणांशी’ कोणताही संपर्क साधायचा नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२१) :- आरोपींनी ‘त्या १६ जणांशी’ कोणताही संपर्क साधायचा नाही. साक्षीदारांवर दबाव टाकायचा नाही, तपासात कोणतीही ढवळाढवळ करायची नाही आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजेरी लावायची या अटींवर स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाचही आरोपींनी सोमवारी (दि. ३०) २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.
पाचही आरोपींची न्यायलयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद शुक्रवारी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांनी अर्जावरील निकाल ३० ऑगस्टपर्यंत राखून ठेवला होता.
या प्रकरणात स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, शिपाई अरविंद भीमराव कांबळे, संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया यांना अटक करण्यात आली आहे. लांडगे यांच्यावतीने अँड. प्रताप परदेशी आणि अँड. गोरक्षनाथ काळे यांनी तर उर्वरित आरोपींतर्फे अँड. विपुल दुशिंग, अँड. कीर्ती गुजर, अँड. संजय दळवी यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.












