न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जाने.) :- जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल व भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती ‘युवक दिन’ उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथम दीपप्रज्वलन करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.
जिजाऊने शिवबावर संस्कार केल्यामुळेच शिवबा मराठी स्वराज्याची स्थापना करू शकले, तर स्वामी विवेकानंद हे दूरदर्शी व्यक्तिमत्व होते, असे सांगत मुख्याध्यापिका हर्षा बाठिया यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. तसेच युवक दिनाचे महत्वही त्यांनी विषद केले. तर शिक्षिका विशाखा भगत, निशा नवगिरे, प्रीती तावरे यांनी विविध कथांच्या माध्यमातून राजमाता जीजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे जीवनकार्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
या वेळी आठवीतील विद्यार्थी वेदांत पाटील याने स्वामी विवेकानंद यांची भूमिका साकारत विवेकानंद यांचे विचार कथन केले. पाचवीतील विद्यार्थिनी सायली जोगी हिने राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारत त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे भाषण दिले. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.











