- पालिकेची चाइल्ड हेल्पलाइन सेवा आजपासून तात्पुरत्या स्वरुपात बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२१) :- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ५ जुलैपासून लहान मुलांसाठी सुरू केलेली चाइल्ड हेल्पलाइन आज बुधवारपासून बंद केली. सण, उत्सवाच्या कालावधीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात हेल्पलाइन बंद केली आहे, अशी माहिती महापालिका हेल्पलाइनचे समन्वयक, उपअभियंता विजय भोजने यांनी दिली.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने लहान मुलांसाठी चाइल्ड हेल्पलाइन सुरू केली होती. शहरातील लहान मुलांना कोरोना आजाराबाबत सविस्तर माहिती मिळावी. त्यांच्या मनातील कोरोनाबाबतची भीती दूर व्हावी, या उद्देशाने लहान मुलांकरिता शालेय विद्यार्थ्यांमार्फत संचालन होणारी चाइल्ड हेल्पलाइन ५ जुलैला सुरू केली. निगडीतील अस्तित्व मॉल येथील स्मार्ट सिटीच्या कंट्रोल अँड कमांड सेंटरमधून याचे काम चालत होते.
सध्या केंद्र व राज्य शासनाने कोरोनाविषयक नियम बऱ्याच प्रमाणात शिथिल केले आहेत, तसेच गौरी गणपती नवरात्र व दीपावली यासारखे सण येत आहेत. या सणांमध्ये, उत्सवामध्ये मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो, तसेच जास्तीत जास्त शाळांना या कालावधीमध्ये सुट्टी असते.
या उपक्रमात दररोज सरासरी पाच कॉलचा ओघ आतापर्यंत २०६ कॉल्स प्राप्त झालेले असून, ४५ दिवसांमध्ये सरासरी ५ कॉल्स प्रतिदिनी येत होते. चाइल्ड हेल्पलाइनबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या समवेत ८ सप्टेंबर रोजी बैठक झाली. त्यात २० सप्टेंबरपासून हेल्पलाइन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्याचे सुचविण्यात आले.












