- दुर्दैवी… चौघांपैकी एकाचा तलावात बुडून मृत्यू; भोसरीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२१) :- भोसरीतील सद्गुरूनगर येथील जुन्या कचरा डेपोजवळ असलेल्या तलावामध्ये १२ ते १५ वयोगटातील चार मुले पोहण्यासाठी गेली होती. खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने ती मुले बुडू लागली. म्हैस चारण्यासाठी गेलेल्या आयुष गणेश तापकीर या तेरा वर्षीय मुलाने ही घटना पाहून तलावात उडी मारली. त्याने तिघांना पाण्याबाहेर काढले. मात्र तेरा वर्षीय मुलगा तलावातून बाहेर आला नाही.
सूरज अजय वर्मा (वय १२, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. संदीप भावना डवरी (वय १२), ओमकार प्रकाश शेवाळे (वय १३), ऋतुराज प्रकाश शेवाळे (वय १४) या तीन मुलांचे प्राण वाचविण्यात यश आले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. जखमीपैकी दोघांना ‘वायसीएम’ रुग्णालयात पाठविण्यात आले. अग्निशामक दलास पाचारण करून सूरज याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे. ही घटना आज सोमवारी दुपारी घडली.