- पाच ठेकेदार आणि दोन बड्या अधिकाऱ्यांना आयुक्तांची कारणे दाखवा नोटिस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इमारतीसह रुग्णालये, दवाखाने शाळा, पाण्याच्या टाक्या, विविध प्रकल्प व वास्तूंच्या सुरक्षेसाठी ठेकेदारी पध्दतीने सुरक्षारक्षक नेमले जातात. मात्र, या ठेकेदारांमार्फत मोठ्या प्रमाणात अनागोंदी व गैरप्रकार केले जातात. त्यामुळे पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान होते. त्या संदर्भात महापालिकेस अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेऊन आयुक्त पाटील यांनी तब्बल १ हजार ३०० कंत्राटी सुरक्षारक्षकांची अचानक पाहणी करण्याचे आदेश दक्षता व गुणनियंत्रण विभागास दिले होते.
त्यानंतर २५ उपअभियंता व २५ मुख्य लिपिकांच्या एकूण ५० अधिकाऱ्यांची पथके तयार करून ३०९ ठिकाणाची पाहणी करण्यात आली. तीन पाळीमध्ये वेगवेगळे सुरक्षारक्षक पुरविण्याची जबाबदारी ठेकेदारांची आहे. परंतु, जागेवर सुरक्षारक्षक उपलब्ध नसणे, त्यांच्याकडे ओळखपत्र नसणे, गणवेश नसणे, दुसरीच व्यक्ती नियुक्त करणे यासारखे गंभीर प्रकार तपासणीत समोर आले आहेत. या प्रकारानंतर आयुक्तांच्या आदेशाने संबधित ठेकेदार एजन्सी आणि दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे.
महाराष्ट्र एक्स सर्व्हिसमेन कॉपोरेशन, इएमकेईवाय फॅसिलिटी सव्हिसेस प्रा. लि., नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस आणि सैनिक इंटेलिजन्स अॅण्ड सिक्युरिटी प्रा. लि. या पाच ठेकेदार एजन्सी दोषी आढळले आहेत. तसेच सुरक्षा विभागाच्या उपायुक्त आशादेवी दुरगुडे आहेत. मुख्य सुरक्षा अधिकारी उदय झरांडे यांनी कामात हलगर्जीपणा करीत दुर्लक्ष केल्याचे पाहणीत उघड झाले. त्यामुळे त्या दोन अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.