- साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांचे प्रतिपादन.
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जाने.) :- राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकुल परिस्थितीशी खंबीरपणे संघर्ष करीत, दृढ निश्चयाने शिवरायांच्या हातून स्वराज्य स्थापनेचे स्वप्न तडीस नेले. त्यांच्या कर्तबगारीचा आदर्श समोर ठेवत असतानाच, मराठ्यांच्या इतिहासातील काही दुमटलेली पाने उलगडण्याची आवश्यकता आहे. छत्रपती संभाजीराजांच्या निघृण हत्येनंतर त्यांच्या पत्नी युवराज्ञी येसूबाई यांनी धिरोदात्तपणे स्वराज्यासाठी दिलेले योगदान आणि छत्रपती राजारामांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी झुंजारपणे औरंगजेबाशी केलेला संघर्ष यामुळेच मराठी स्वराज्याची मशाल तेवत राहिली. त्यांच्या कर्तबगारीची पाने उलगडून आजच्या पिढीपुढे मांडण्याची आवश्यकता असून, पुढील काळात आपण ते करणार आहोत, असे प्रतिपादन कामगार नेते व साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांनी गुंजाळवाडी ( ता.जुन्नर) येथे बोलताना केले.
गुंजाळवाडी येथील ग्रामस्थ आणि स्वामी विवेकानंद विचार मंचाने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोऱ्हाडे बोलत होते. द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष हरिभाऊ वायकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
छत्रपती संभाजीराजांच्या हत्येनंतर मोघलांचा सरदार झुल्फिकारखानाने रायगडाला वेढा घातला. त्यावेळी विचलित न होता, धीरोदात्तपणे येसूबाईंनी आठ महिने रायगड लढविला. राजाराम महाराजांना सुखरूपपणे दक्षिणेत जिंजीकडे पाठवून, राज्याची व्यवस्था लावली. झुल्फिकारखानाने रायगड जिंकल्यावर त्यांना कैद केले. सुमारे एकोणतीस वर्षे त्या राजकैदी म्हणून मोगलांच्या कैदेत होत्या. स्वराज्यासाठीचे त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. तसेच ऐन तारुण्यात सततच्या युध्दप्रसंगांना सामोरे जात, अति दगदगीने राजाराम मरण पावले. त्यांची पत्नी महाराणी ताराबाई सैन्याला धीर देत सात वर्षे रणभूमीवर स्वतः लढत राहिल्या, त्यांच्या शौर्याला इतिहासात तोड नाही. ऐन तारुण्यात आलेल्या वैधव्याला झुगारून स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी छत्रपतींच्या या दोन्ही सुनांचे धैर्य व कर्तबगारी आजच्या महिलांनी प्रेरणा म्हणून समोर ठेवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
स्वामी विवेकानंद हे सत्यशीलता, चारित्र्य, बुध्दीमत्ता, बल आणि धैर्याचे प्रतिक होते. व्यवहारी जीवनात उभे राहण्याचे सामर्थ्य घडविणारे शिक्षण दिले पाहिजे, ही विवेकानंदांची धारणा होती. प्रत्येक भारतीयाने त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची गरज आहे, असे बोऱ्हाडे यांनी सांगितले.
यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडूंचा तसेच, शेतीनिष्ठ महिला शेतकऱ्यांचाही बोऱ्हाडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे, प्रशासकीय अधिकारी सिध्देश ढवळे, सरपंच युवराज शिंदे, पवन वायकर, राम सासवडे, ज्ञानेश्वर वायकर, दामोदर वहिले इत्यादी उपस्थित होते.











