न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. १६ जाने.) :- महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप केले असतानाच, त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे बंधू आणि आमदार नितेश राणे हे मैदानात उतरले आहेत. ”अंगावर आले तर शिंगावर घेणारच, आमच्या नादी लागायचं नाही, असा इशारा त्यांनी शिवसेनेस दिला आहे.
या घटनेमुळे शिवसैनिक चांगलेच खवळले असून, नितेश राणेंच्या या वक्तव्याचा राज्यभर निषेध नोंदवला जात आहे. या घटनेचे लोन पिंपरी चिंचवड शहरात पसरले असून, वाकड येथील कस्पटे वस्ती परिसरातील छत्रपती चौकात वाकड-पिंपळे निलख शिवसेना विभागप्रमुख मुकेश कस्पटे यांच्या नेतृत्वाखाली नितेश राणे व राणे कुटुंबियांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी नितेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.
मुकेश कस्पटे यावेळी म्हणाले की, ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर राणे कुटुंब गब्बर बनले. ज्यांच्या आशीर्वादामुळे नारायण राणे यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले व आपले वर्चस्व निर्माण केले. त्या राणेंच्या सुपुत्रांनी महाराष्ट्राची अस्मिता बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व ठाकरे कुटुंबियांच्या नादी लागू नये. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा कस्पटे यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी शिवसेनेचे पिंकल यादव, रोहित अत्रे, समीर इनामदार, सोनू कस्पटे, गोरख येवले, पवन पवार, किरण देहाडे, समीर कस्पटे, विशाल पवळे आदी शिवसैनिक उपस्थित होते. निदर्शनावेळी ‘राणेंचा धिक्कार असो’, ‘खाली डोके वर पाय, या राणेचे करायचे काय’ अशा आदी घोषणा देण्यात आल्या.











