- शास्तीकराचा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत सत्ताधाऱ्यांना झोपू देणार नाही
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जाने.) :- पंधरा दिवसात शास्तीचा निर्णय घेऊन सामान्य मानसाला दिलासा देण्याची घोषणा पिंपरी चिंचवड दौऱ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याचे शहरातील नागरिकांना स्मरण व्हावे. तसेच सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेची कार्यवाही करावी, याकरीता सर्व विरोधी पक्षीय नेत्यांनी ‘काऊंट डाऊन’ चा फलक महापालिका भवनासमोर लावला होता.
यास विरोध करीत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पिंपरी-चिंचवडकरांवर शास्तीकर लादण्याचे पाप राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात शास्तीकर अंमलबजावणी झाली असल्याचे त्यांनी सांगितले होते. आघाडी सरकारने लादलेले ‘पाप’ ‘धुवून’ काढायचे काम आमचे भाजप सरकार करीत आहे, असा उपरोधिक टोला विरोधकांना मारला होता.
त्यावर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पलटवार केला असून, राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे सलग्न आमदार लक्ष्मण जगताप यांच्या काळातच शास्तीकराचे विधेयक विधीमंडळात पारित झाले होते. त्यामुळे शास्तीकर पाप असल्यास आता जगताप भाजपमध्ये असल्याने शास्तीकराचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी भाजपवरच आहे.
यावेळी साने यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री शहरात आल्यानंतर तीनही वेळेस त्यांनी शास्तीकर, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शास्तीकर माफ झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर दोन्ही आमदारांनी प्रश्न सुटल्याचे सांगत शहरभर फलक व पेढे वाटले होते. त्यामुळे १०० टक्के शास्तीकर माफी करण्याची भाजपची जबाबदारी आहे. ६०० स्केअर फुटापर्यंतच्या मालमत्तांचा शास्तीकर माफीचा लाभ आमदारांच्या बगलबच्यांना झाला आहे. तोपर्यंत भाजपला झोपू देणार नाही, असा इशाराही साने यांनी दिला असून, जोपर्यंत १०० टक्के शास्तीकर माफ होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी शास्तीकर भरु नये. तसेच भाजपला झोपूही लागू देणार नाही, असा इशाराही विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी यावेळी दिला आहे.











