शहराच्या राजकारणाचा बदलता कल
आगामी निवडणुका ……… भाजप…… व इतर पक्षीय…..
लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होते किंवा नाही, यावरच पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये जाऊन तिसऱ्यांदा आमदारकी पटकावली. त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सुपडा साफ करून, पिंपरी-चिंचवड महापालिकाही भाजपला जिंकून दिली. मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघाविषयी युतीत काय तोडगा निघणार, यावरच शहराचे राजकारण कोणत्या दिशेने वाहणार, हे स्पष्ट होणार आहे. अवघ्या काही काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख पक्षांच्या सद्यस्थितीचा थोडक्यात आढावा या लेखात घेण्यात आलेला आहे.
स्थानिक नेत्यांच्या नव्हे तर मोदींच्या करिष्म्यावर भाजपची भिस्त
लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर पिंपरी-चिंचवड शहरात भाजपची ताकद बऱ्यापैकी वाढली व त्याचा प्रत्यय महापालिका निवडणुकीत आला. बलाढ्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता भाजपने खेचून आणली. महापालिकेच्या सर्वच पदांवर भाजपचे नगरसेवक आहेत आणि भाजप म्हणेल ती पूर्व दिशा, असे पिंपरी चिंचवड शहराचे सध्याचे राजकारण झाले आहे. स्मार्ट सिटी, कचराप्रश्न, अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, संतपीठ तसेच आदी विकासात्मक कामांच्या विषयावरून भाजप चर्चेत राहिले. परंतु, या विकासकामांपेक्षा त्यात झालेल्या घोटाळ्यांचीच चर्चा अधिक झाली. पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात अनेक विषयांवरून वादंग उभे राहत असे, परंतु, बारामतीच्या दादाने नुसती नजर जरी वटारली तरी, समोरचा गारद व्हायचा. परंतु, सत्ताधारी भाजपमध्ये असा दादा नाही. आहेत ते स्व-उद्योगांत मग्न आहेत. त्यामुळे पक्षातील पूर्वाश्रमीचे व आयात कार्यकर्त्यांमध्येच बेबनाव आहे. याचा निश्चितच फटका भाजपला आगामी निवडणुकीत बसू शकतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच करिष्म्यावर आगामी निवडणुकांना भाजपला पून्हा सामोरे जावे लागेल. यात तिळमात्र शंका नसावी.
शिवसेनेत सर्वच काही आलबेल नाही.
पिंपरी-चिंचवड शहरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. दोन महिन्यांनी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होणाऱ्या मावळ आणि शिरुर या दोन्ही मतदार संघात शिवसेनेचे खासदार आहेत. तर पिंपरी विधानसभेत एक आमदार आहे. मागील विधानसभा निवडणूक व महापालिका निवडणुकीत आलेल्या भाजप लाटेमुळे शिवसेनेला गड काबीज करणे सोपे गेले. परंतु, यंदाची लोकसभा निवडणूक शिवसेनेसाठी आव्हानात्मक आहे. त्यातच चिंचवड विधानसभेचे प्रमुख दावेदार राहुल कलाटे व मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या आप-आपसात रंगणाऱ्या शीतयुद्धामुळे पक्षात गटबाजी फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे आगामी लोकसभेची निवडणूक शिवसेनेला अवघड ठरण्याची चिन्हे दिसतात. त्यातच युतीचे चित्र स्पष्ट नसल्याने भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे भविष्यात शिवसेनेत खांदेपालट होण्याची शक्यता जास्तच आहे.
आगामी निवडणुक राष्ट्रवादीस अनुकूल परंतु, गटबाजी रोखणार कशी?
अंतर्गत कलह आणि गटबाजीचा शाप असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पिंपरी-चिंचवडच्या एकूणच राजकारणाचा धावता आढावा घेतला, तर हा पट्टा कायम पवार काका-पुतण्यांना मानणारा असल्याचे दिसून येते. यात अजित पवार हे नाव पिंपरी-चिंचवडच्या केंद्रस्थानी आहे. सध्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. एकेकाळचा अजितदादा यांचा हुकमी एक्का आमदार लक्षण जगताप यांनी राष्ट्रवादीशी अधिकृतपणे काडीमोड घेत भाजपशी घरोबा केला. त्याच पद्धतीने, अपक्ष निवडून आलेल्या आमदार महेश लांडगे यांनी भाजपचा रस्ता धरला. माजी महापौर आझम पानसरे यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक व ताकतीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे एकेकाळी अतिशय केविलवाणी अवस्था असलेल्या भाजपची ताकद प्रचंड वाढली. राज्यात व महापालिकेत सत्ता गेल्यानंतर सर्व गोष्टींची उपरती आत्ता कुठे राष्ट्रवादीस झाली आहे. सत्ताधारी भाजपच्या अनेक चुकीच्या निर्णयार्थ मोर्चे, आंदोलने करून राष्ट्रवादीने नेहमी आपल्याला चर्चेत ठेवले. भाजपच्या निरंकुश सत्तेस आव्हान देत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या विरोधी सुरात सूर मिसळून इतर पक्षीयांनाही राष्ट्रवादीने यानिमित्ताने आपले केल्याचा देखावा पहावयास मिळत आहे. माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, नाना काटे, संदीप काटे यांच्यासारख्या कसलेल्या नेतृत्वाने सत्ताधारी भाजपला जेरीस आणले आहे. तसेच घाटाखालून अपेक्षित मदत झाल्यास त्याचा निश्चितच फायदा पक्षाला आगामी निवडणुकीत होईल. परंतु, ही बांधलेली मोट विस्कळीत होण्यास पक्षातील अंतर्गत गटबाजी कारणीभूत ठरू शकते. त्यातच बारामतीचा आणखी एक शिलेदार पिंपरी चिंचवडच्या राजकारणात डोकावू पाहत आहेत. त्या शिलेदाराला शहरातील स्थानिक नेतृत्व कसे स्वीकारणार? हाही कळीचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होत आहे. यास पक्षाचे मुरब्बी राजकारणी अजित पवार कसे सामोरे जातात? व त्याचा फायदा पक्षाला कसे करून देतात? हे पाहणे औचित्याचे ठरेल.
काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न
पिंपरी चिंचवडच्या राजकारणात एकेकाळी बलाढ्य पक्ष समजला जाणाऱ्या कॉंग्रेसचे अस्तित्व केवळ नावालाच उरले आहे. मतदार आहेत पण कार्यकर्तेच नाहीत, अशी स्थिती झालेल्या कॉंग्रेसला गटबाजीने पुरते पोखरले आहे. अशा परिस्थितीमध्ये कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी बुडती नौका वाचवून शहरात संघटना बांधणीकडे लक्ष दिले. त्यांनी गटबाजी मोडून काढली. त्यांच्या कामाची पद्धत अनेकांना सहन झाली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी पक्ष सोडून इतर पक्षात घरोबा केला. काही पक्षात नसले तरी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. पक्ष नेतृत्वानेही कायमच पिंपरी चिंचवड शहराकडे दुर्लक्ष केले. खंबीर कार्यकर्तेच नसल्यामुळे आज पक्षाची पूर्ण वाताहत झाली आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस आगामी निवडणुकींना सामोरी जात आहे. आज अन्य पक्षांकडून मातब्बर उमेदवार आयात करण्याची रणनीती आखली जात आहे. फोडाफोडीचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे उरली सुरली कॉंग्रेसदेखील संपविण्याचा प्रयत्न मित्रपक्षांसह विरोधकांकडून होत आहे. कॉंग्रेसच्या दृष्टीने ही निवडणूक सर्वबाजूंनी आव्हानात्मक ठरणार आहे. यात एकच गोष्ट होऊ शकते. जर मोदी लाट ओसरली व मतदारांनी ठरवले तर मात्र, कॉंग्रेसला मोठा जॅकपॉट लागण्याची चिन्हे दिसतात.
शहरात मनसेची वाढ खुंटली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलुख मैदानी तोफेकडे आकर्षित होऊन तमाम युवा-वर्गाने मनसेला आपलेसे केले. सुरुवातीला पक्ष वाढीसाठी प्रयत्नही झाले. परंतु, राज ठाकरे यांच्या पक्षीय धोरणांचा फटका जसा मनसेला राज्यात बसला तसच शहरातही बसला आहे. त्यामुळेच गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत कसबसा एक नगरसेवक निवडून आला. त्यात शहराध्यक्ष व नगरसेवक असलेले सचिन चिखले यांच्या चाकोरीबद्ध कामाच्या पद्धतीमुळे शहरात मनसेची वाढ खुंटलेली दिसते. मनसे मरगळ झटकून आगामी निवडणुकीस कसा सामोरे जातो याची नागरिकांना उत्सुकता असेल.
केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या सेना-भाजप या दोन्ही राजकीय पक्षांमध्ये युती झालीच नाही, तर मात्र, पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणास पून्हा एकदा कलाटणी मिळणार आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणाचा चेहरा-मोहराच बदलला. शहरातील काही प्रमुख पक्षांच्या थोडक्यात केलेल्या विश्लेषणावरून एकच गोष्ट सिद्ध होते. ती म्हणजे परिवर्तन. ते होणार की नाही? हे मात्र, मोदींच्या व स्थानिक नेतृत्वाने गेल्या पावणेपाच वर्षात केलेल्या कामगिरीच्या मुल्यांकनावरच अवलंबून असेल.

















