- सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपटगृह खुली होणार; राज्याचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२१) :- दिवाळीपूर्वीच राज्यातील बंदिस्त सभागृहे आणि मोकळ्या जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपटगृह येत्या २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे मात्र अनिवार्य असेल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची आयोजकांची जबाबदारी असेल. बंदिस्त सभागृहाच्या एकूण बैठक क्षमतेच्या ५० टक्के इतकीच प्रेक्षक क्षमता राहील. दोन प्रेक्षकांमध्ये सहा फुटांचे अंतर असेल. कलाकारापासून प्रेक्षक कमीत कमी ६ फूट अंतरावर असावेत. सर्वासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य असेल. कार्यक्रमाच्या ठिकाणी खाद्यपदार्थ / पेये विक्रीस बंदी राहील.
चित्रपटगृहे सिनेमागृह, स्टॉल्सचे कर्मचारी यांचे लसीकरण आवश्यक आहे. ऑडिटोरिअम, कॉमन आणि वेटिंग एरियात गर्दी होऊ न देणे गरजेचे. मास्क व थर्मल चेकअप आवश्यक. मल्टिप्लेक्समध्ये मध्यांतर एकाच वेळी होऊ नये, याची काळजी घ्यावी. प्रेक्षकांचे लसीकरण झालेले असणे वा आरोग्य सेतूवरील त्यांची आरोग्य स्थिती सुरक्षित आहे, असे दर्शविलेले असणे आवश्यक, प्रतिबंधित क्षेत्रात चित्रपटगृहे बंद असतील.
अतिथीना कलाकारांच्या कक्षांमध्ये परवानगी दिली जाणार नाही. कलाकार, कर्मचारी तपासणी गरजेची. सर्व कक्ष सैनिटाईझ असणे अनिवार्य. सर्वासाठी मास्क आवश्यक. प्रेक्षकांची आसनक्षमता ५० टक्के. बाल कलाकारांव्यतिरिक्त सर्व कलाकार / कर्मचाऱ्यांचे लसीकरण आवश्यक, बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅपवर आरोग्य स्थिती सुरक्षित असावी. प्रेक्षकांचे लसीकरण झालेले असावे वा आरोग्य सेतूवरील त्यांची आरोग्य स्थिती सुरक्षित दर्शविलेली असावी, अशा मार्गदर्शक प्रणालींचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.