- उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२१) :- बिबवेवाडी येथे अल्पवयीन विद्यार्थिनीची कबड्डी खेळत असताना कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचं त्यांनी म्हटलंय.
“पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल,” असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे.
“यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत”.