डॉ. पवन साळवे उत्तम प्रशासक !
न्यूज पीसीएमसी नेटवर्क : पिंपरी : अपुऱ्या सुविधांमुळे वाय. सी. एम. रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय होत असून रुग्णालयाचे सक्षमीकरण लवकरात लवकर करावे, तसेच वाय. सी. एम. च्या माजी-आजी अधिकाऱ्यांमध्ये योग्य तो समन्वय साधून रुग्णालयातील सावळा गोंधळ संपवावा अशी मागणी जन अधिकार संघटनेचे अध्यक्ष मज्जीद शेख यांनी वाय. सी. एम. चे वैद्यकीय अधिक्षक यांच्याकडे केली आहे.
डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाने वैद्यकीय उपचार महाग केल्यामुळे उपचाराकरिता सर्वसाधारण रुग्णांचा लोंढा वाय.सी.एम रुग्णालयाकडे वाढत असून रुग्णालयाने त्यांना योग्य त्या वैद्यकीय सुविधा पुरविणे गरजेचे आहे.
पिंपरी-चिंचवड महनगरपालिकेच्या वाय.सी.एम रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्या कार्यकाळात रुग्णालयाने कात टाकली असून अनेक सोयीसुविधा पुरवून रुग्णालयाचा कायापालट केला आहे.
पूर्वीचे मा. वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्या कार्यकाळात रुग्णालयाचे सक्षमीकरण झाले नाही. अनेक वादग्रस्त निर्णय घेतल्यामुळे रुग्णांची हेळसांड झाली.
नूतन वैद्यकीय अधिकारी पवन साळवे हे कार्यक्षम अधिकारी असून अनेक चांगले निर्णय घेऊन त्यांनी रुग्णालयास शिस्त लावली आहे. परंतु डॉ. रॉय व त्यांचे सहकारी डॉ. साळवे यांच्या कामात विनाकारण लुडबुड करून त्यांना नाहक त्रास देत असल्यामुळे रुग्णालयात बेशिस्त कारभार वाढत असून आयुक्तांनी वेळीच लक्ष घालून रुग्णालयाचा कारभार पुर्वपातळीवर आणावा अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सुशीलकुमार दुमणे, पिंपरी-चिंचवड सलमानी महिला आघाडी वेल्फेअर संघटनेच्या अध्यक्षा सईदा शेख व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
















