- मल्टी नॅशनल कंपनीचा प्रताप; आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. ऑक्टोबर २०२१) :- स्मार्ट सिटीतील तक्रारींवर आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांच्यासमोर गुरुवारी ( दि .१४ ) तासभर सुनावणी झाली. तक्रारदारांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेऊन योग्य कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
या वेळी स्मार्ट सिटीचे अधिकारी शहर अभियंता राजन पाटील, सहमुख्य कार्यकारी अधिकारी नीलकंठ पोमण, सहशहर अभियंता अशोक भालकर यांच्यासह सल्लागार, अधिकारी तक्रारदार भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे, शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे आदी उपस्थित होते.
स्मार्ट सिटीतील सिटी नेटवर्क, सिटी वायफाय, स्मार्ट किऑक्स, मेसेज डिस्प्लेचे सुमारे २५० कोटींचे काम एल अॅण्ड टी लिमिटेड कंपनी करीत आहे. त्या कामाला तांत्रिक मान्यता (टेक्निकल सॅक्शन) घेतली नाही. जादा अंतर वाढवून सुमारे ७५० किलो मीटरच्या खोदाईचे अंदाजपत्रक तयार केले. त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढली ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेऊन निविदा काढण्यात आली, अशी तक्रार नगरसेविका सावळे यांनी केली.
स्मार्ट सिटीतील कामे करताना मुदतीपेक्षा अधिक विलंब झाल्यास १० टक्के विलंब दंड करण्याचा नियम आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी परस्पर अटी व शर्तीत बदल करून तो दंड एक टक्का केला आहे. त्यामुळे ठेकेदार संथ काम करीत आहेत. तसेच, पॅकेज निविदा पद्धतीमध्ये अनेक नियम ठेकेदारांच्या फायद्याचे केले आहेत. त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे, अशी तक्रार शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी केली.
तक्रारींबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्यांनी चूक झाल्याचे मान्य केले. त्याबाबत आयुक्त काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. तसेच, या संदर्भात आयुक्त तक्रारदारांना येत्या २ ते ३ दिवसांत लेखी उत्तर देणार आहेत, असे सुलभा उबाळे यांनी सांगितले.