- महापालिका निवडणुकीसाठी कोणी सरसेनापती नाही..
- अजित पवार, जयंत पाटील आणि स्थानिक नेत्यांचा निर्णय प्रक्रियेत समावेश …
- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. ऑक्टोबर २०२१) :- पक्ष कसा चालवायच? याचा निर्णय आम्ही घेऊ. त्याबाबत आम्हाला कोणी सांगायची गरज नाही. इथे पक्षाचे धोरण ठरवण्याचे अधिकार आम्हाला आहे, असा इशारा शरद पवार यांनी विरोधकांना दिला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पिंपरी चिंचवड शहरात दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. आज शनिवारी (दि. १६) रोजी शहरात आजी-माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. तसेच त्यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आकुर्डीत पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. रविवारी त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होणार आहे.
पत्रकार परिषदेला आमदार अण्णा बनसोडे, खा. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, नगरसेवक योगेश बहल, माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी आदी उपस्थित होते.
गत विधानसभा निवडणुकीत भोसरी आणि चिंचवड मतदार संघातून राष्ट्रवादीला उमेदवार देता आला नाही. तसेच सध्या शहरात पक्षाचा जोर कमकुवत होतोय, पक्षाला प्रवक्ता नाही, अशी विरोधक टीका करतात, असे प्रश्न विचारून पत्रकारांनी शरद पवारांची फिरकी घेतली.
आगामी २०२२ च्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळावे, याकरिता सरसेनापती कोण असेल? असा प्रश्न विचारला असता; पवार म्हणाले, इथे पक्षाचे धोरण ठरवण्याचे अधिकार प्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष, खासदार, स्थानिक नेते, जेष्ठ सहकारी या सर्वांना आहे. त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन याबाबतचा निर्णय घ्यावा. कोणा एकाला याबाबतचे धोरण ठरविण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले.