- थेरगाव, तापकीर चौक, काळेवाडी फाटा, सोळा नंबर परिसर मोकळा श्वास घेणार..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२१) :- ‘ ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत थेरगाव, तापकीर चौक, काळेवाडी फाटा, डांगे चौक, सोळा नंबर या परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेच्या वतीने नुकतीच कारवाई करण्यात आली.
व्यावसायिकांनी फुटपाथवर ठेवलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत. तसेच या वस्तू ग क्षेत्रीय कार्यालय येथे जमा करण्यात आल्या आहेत. यामध्ये १२० बोर्ड, तीन प्लास्टिक जाळ्या, पाच प्लास्टिक ट्रे, तीन वजन काटे, ३२ प्लास्टिक खुर्च्या, दोन हात गाड्या, लोखंडी टेबल व इतर किरकोळ वस्तू वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
डांगे चौक ते काळेवाडी फाटा, काळेवाडी फाटा ते कस्पटे चौक या दरम्यान नेहमीच वाहतूककोंडी होत असते. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या पालेभाज्यांच्या गाड्या, इतर हातगाड्या आणि विरुद्ध दिशेने येणारी वाहने यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. अखेर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आल्यामुळे परिसरातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे. क्षेत्रीय अधिकारी रविकिरण घोडके, अतिक्रमण पथकप्रमुख जगताप, बीट निरीक्षक आदी या कारवाईत सहभागी झाले होते.


















