- आयुक्त राजेश पाटील यांचे स्थानिकांना आश्वासन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२१) :- थेरगाव डांगे चौकातील ग्रेडसेपरेटरचे संथगतीने काम सुरू आहे. त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या तक्रारीची दखल घेऊन मंगळवारी मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी या कामाची पाहणी केली. तसेच, १५ नोव्हेंबरपर्यंत ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे सांगितले.
महापालिका आयुक्त पाटील यांच्या दौऱ्याच्या वेळी खासदार श्रीरंग बारणे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, विश्वजित बारणे, ग प्रभाग अधिकारी रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, उपअभियंता चंद्रशेखर धानोरकर, संध्या वाघ, अमोल थोरवे आदी उपस्थित होते.
ग्रेडसेपरेटरच्या कामाला गती दिली जाईल. कामात त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल. थेरगाव, गणेशगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर भविष्यात अपघात होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या आयुक्त पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच १५ नोव्हेंबरपर्यंत ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे आश्वासन दिले.