न्यूज पीसीएमसी नेटवर्क : पिंपरी :- साहित्यामध्ये मोठी ताकद आहे. समाजाला दिशा देण्याची कामगिरी कवी आणि लेखकांमध्ये आहे. आपल्या प्रतिभेतुन मानवतेचे मूल्य जपणारे काव्य निर्माण व्हावे, असे प्रतिपादन माजी आमदार श्री उल्हासदादा पवार यांनी पिंपरीत बोलताना व्यक्त केले.
आदित्य होमिओपॅथी हॉस्पिटलमध्ये आयोजित “काव्यरंग” मैफिलीत ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.
यावेळी कवी अनिल कांबळे, ज्योत्स्ना चांदगुडे, रुपा बेंडे आणि अरुण बोऱ्हाडे यांनी कविता, गीत आणि गझलांचे सादरीकरण केले. माजी महापौर श्री संजोग वाघेरे यांच्या हस्ते या मैफिलीचे उद्घाटन झाले. कवी अनिल कांबळे यांनी त्यांची सुप्रसिद्ध गझल “द्यायचेच आहे तर माझे जुने प्रहर दे मला..”
या कवितेने प्रेक्षकांची वाहवा मिळविली. तर ज्योत्स्ना चांदगुडे यांनी – “तुमचे भाव तुमच्या भावना शब्द माझे असतील, माझ्या कुठल्या या कविता तुमच्याच तर नसतील.”
-आणि
“काही कविता डोळ्यांतून अश्रू होऊन झरतील, तर काही कविता हसता हसता अंतर्मुख करतील.” या कवितेला रसिकांनी दाद दिली. तर रुपा बेंडे यांनी पैलू ही कविता सादर केली. “पैलू असे पडत गेले, सुरेख मी घडत गेले, घडता घडता सवे तुझ्या, प्रेमात मी पडत गेले..”
अरुण बोऱ्हाडे यांनी “सारीपाट” या कवितेतील –
“आयुष्याचा अश्वमेध
उधळला कशासाठी,
नाही उमगले कुणा
थबकला कशासाठी..”
या ओळींनी सर्वांनाच अंतर्मुख करायला लावले.
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफिलीत अनिल कांबळे यांच्या- “त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी..” या कवितेने समारोप झाला. शैलेंदू शुक्ल यांनी हिंदी हास्यकविता सादर केली.
संजोग वाघेरे यांनी मनोगत व्यक्त केले. उल्हासदादा पवार यांनी आपल्या भाषणात गझलकार सुरेश भट यांच्या कवितांच्या आठवण करून देताना काही ओळी म्हणून दाखविल्या. डॉक्टर अमरसिंह निकम आणि विजय भिसे यांनी या मैफिलीचे आयोजन केले. डॉ.मनिष निकम यांनी स्वागत केले, विजय भिसे यांनी प्रास्तविक, तर आषिश चोबे यांनी आभार मानले.
















