- पालिकेची उडलीय धांदल; नागरिकांचा घेतला जातोय शोध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरातील तब्बल १ लाख ९९ हजार नागरिकांनी ८४ दिवसांची मुदत संपूनही कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला नाही. त्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना लस देण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागास कसरत करावी लागणार आहे. त्या दृष्टीने लस न घेतलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
महापालिका व खासगी रुणालयांच्या सोमवार (दि. ६) पर्यंतच्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार शहरातील तब्बल २६ लाख ८६ हजार ८५२ नागरिकांनी कोरोनाचा डोस घेतला आहे. पहिला डोस १५ लाख ५७ हजार ५१३ जणांनी घेतला आहे. तसेच, पुणे शहरात जाऊन अनेकांनी लस घेतली आहे. ते एकूण प्रमाण तब्बल १५ टक्के इतके आहे.
पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस ८४ दिवसांनी घ्यावा लागतो. त्यात केवळ ११ लाख २९ हजार ३३९ व पुणे शहरात लस घेतलेले धरून एकूण ७० टक्के जणांनी लस घेतली आहे. मुदत संपूनही तब्बल दोन लाख जणांनी दुसरा डोस अद्याप घेतलेला नाही. त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन बुचकळ्यात पडले आहे. पालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाकडून त्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. लस न घेतलेल्यांना लस दिली जात आहे. लवकरात लवकर लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासन वेगगेगळ्या उपाययोजना करीत आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतर बूस्टर डोस घेण्याची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यानुसार केंद्र व राज्य शासन नियोजन करीत आहे. बूस्टर डोस पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर व फ्रंटलाइन वर्कर यांना देण्यात येणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिका त्याबाबत नियोजन करीत आहे, असेही आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले.
दुसरा डोस घेतला नाही त्यांनी तत्काळ डोस घ्यावा. महापालिकेकडे पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध आहे. घराजवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लस घेऊन आपली जबाबदारी पार पाडावी आणि महापालिकेस सहकार्य करावे. त्यासाठी महापालिकेकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.
– मा. राजेश पाटील ( आयुक्त, पिं. चिं. मनपा)…