न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जाने.) :- सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश / मराठी मिडियम स्कूल आणि भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नीलम जाधव यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील, भटू शिंदे, प्रिया मेनन, कलाशिक्षिका दीपिका शिडीमकर यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढत जुनी सांगवी परिसर घोषणांनी दणाणून सोडला. ‘पृथ्वी वाचवा’, ‘पर्यावरण वाचवा’, ‘मुलगी वाचवा’, ‘स्वच्छता राखा’, ‘जय जवान, जय किसान,’ ‘प्लास्टिकचा वापर टाळा’, अशी घोषवाक्ये लिहिलेले फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर केलेले नृत्य लक्षवेधक ठरले. तसेच माणसातला अहंकार नष्ट होऊन एक सशक्त समाज निर्माण व्हावा, यावर आधारीत नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सहायक पोलीस आयुक्त नीलम जाधव म्हणाल्या, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून संरक्षण दल, पोलीस प्रशासनात यावे. आज या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. या संधींचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. तसेच सामाजिक कार्यातही विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले. अतूल शितोळे, प्रिया मेनन यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.











