- नगरसेवक प्रवीण भालेकर यांचे उपमुख्यमंत्री अजितदादांना पत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२१) :- रेडझोन बाधीत अनधिकृत बांधकामे गुंठेवारी कायदयाने नियमितीकरणास अपात्र ठरत असल्याने अशा मिळकतींचा अवैध बांधकाम शास्तीकर संपूर्णपणे रद्द करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून पत्राद्वारे केली आहे.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने राज्यातील महापालिका हद्दीमधील ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमामध्ये सुधारणा केली आहे. त्याबाबतचा अध्यादेश १८ ऑक्टोबर रोजी काढला आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरामधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. तथापी रेडझोन मधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यास अपात्र ठरत असल्याने वर्षानुवर्षे या भागामध्ये राहत असलेल्या गोरगरिब नागरिकांवर अवैध बांधकाम शास्तीकराची टांगती तलवार कायम आहे.
रेडझोन जाहिर होण्यापुर्वीच यातील अनेक मिळकती लघुउद्योजक, कामगार व स्थानिक नागरिकांनी विकसीत केलेल्या आहेत. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने या मिळकत धारकांना सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत. रेडझोन हद्दीचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. अशा परिस्थितीमध्ये २००८ नंतरच्या अनाधिकृत बांधकामावर लावलेला अवैध बांधकाम शास्तीकर अयोग्य आहे. शास्तीकरांमुळे अनेक नागरिकांच्या मिळकत कराची थकबाकी घर आणि जागेच्या किंमतीपेक्षाही अधिक झाली आहे, त्यामुळे या परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. दादा, रेडझोन परिसरातील अनधिकृत बांधकामे नियमित होण्याची शक्यता नसल्याने या मिळकतीवरील शास्तीकर पुर्णतः माफ करून या भागातील नागरिकांना तुर्तास दिलासा दयावा, असे या पत्रात नगरसेवक भालेकर यांनी म्हटले आहे.
















