- लवकरच मेट्रो प्रवाशांसह धावण्याचा अधिकाऱ्यांचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२१) :- महामेट्रोच्या वतीने पिंपरी ते फुगेवाडी या ७ किलोमीटर अंतराच्या मार्गाची नवी दिल्लीच्या कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) जनककुमार गर्ग यांनी ३ दिवस पाहणी, चाचणी व सुरक्षा तपासणी केली. महामेट्रो केलेल्या काम व सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. लवकरच त्यांच्याकडून प्रवासी वाहतुकीस ना हरकत प्रमाणपत्र मिळेल, असे सकारात्मक चित्र आहे.

कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी जनककुमार त्यांच्या पथकाने वरील संपूर्ण मार्गावर मोटार ट्रॉली तसेच, मेट्रोत बसून प्रवास करीत मार्गाची बारकाईने तपासणी केली. मार्गासह पाच स्टेशनवरील विविध सुविधांची पाहणी करून प्रवाशांना कोणत्या सेवा पुरविण्यात आलेल्या आहेत. तसेच, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत काय उपाययोजना केल्या आहेत, यांचा आढावा घेतला. हा पाहणी दौरा रविवार (दि. २६) ते. मंगळवार (दि. २८) असे ३ दिवस चालला.
फुगेवाडी, कासारवाडी, नाशिक फाटा, संत तुकारामनगर व पिंपरी – चिंचवड महापालिका भवन या सर्व ५ मेट्रो स्थानकांची त्यांनी पाहणी केली. जिन्यांची व्यवस्था तपासली. लिफ्ट व एस्केलेटरची एनबीसी मानकानुसार चाचणी घेतली. दिव्यांग व सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो स्टेशनमध्ये स्वच्छतागृह, रॅम्प, आसन व्यवस्था आदी सुविधांची पाहणी केली. अग्रिरोधक यंत्रणेची चाचणी केली. धूर शोधणे व फायर अलामंचे मॉक ड्रिल घेण्यात आले. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मेट्रो स्टेशन नियंत्रण कर्मचाऱ्यांची तयारी व आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना बाहेर काढणे आदींची व्यवस्था तपासून घेतली. स्टेशनचे प्रवेशद्वार व तिकीट केंद्र तपासले . स्टेशनवरील सहायक उपकेंद्र , टेलकॉम , संवाद , सिप्रलिंग सुविधांची पाहणी केली . पालिका भवन ते फुगेवाडी असे दोन्ही दिशेने मोटार ट्रॉलीत बसून त्यांनी तपासणी केली. त्यांच्याकडून लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रवासी वाहतूक सुरू करता येईल, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.















